विद्यार्थ्याची आठवण, एका बसप्रवासाची | Akp51v मराठी

सकाळी पाच वाजता उठायचो मी. सात वाजेपर्यंत सकाळी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून, आईआजीने दिलेला डबा बॅगेत भरून, मी धाव मारायचो. पण ती सातची बस कधीकधी पार साडेआठला उगवायची. धन्यबा इट्ठला. किती तो संयम शिकलो मी, बसच्या कृपेने.

बॅग होती सात किलो वजनाची. नाही. कधीकधी हे वजन नऊ किलोचं असायचं. दीर्घकाळ वजन बॅग पाठीवर घेऊन उभे राहिले असता, आपल्या मणक्यावर ताण पडत असतो. त्यामुळे मी बॅगेला त्या बाकावर ठेवायचो.

Buses and traveling Marathi memoire - article image
ब्लॉग इमेज: Bus travel memories.

सात वाजता व सव्वाआठ वाजता. अश्या दोन गाड्या असायच्या सकाळच्या वेळी. आधी सांगितल्याप्रमाणे जर का सातच्या गाडीला उशीर झाला, तर सव्वाआठची बस पकडायचो.

परंतु सातच्या बसला गर्दी कमी असायची. आणि शक्यतो सगळेच आत्मे झोपून घ्यायचे. कारण त्यांना रेल्वेपर्यंत पोहोचायला एक तास लागायचा. रेल्वेस्थानकानंतर माझा टप्पा यायचा. त्यामुळे काहीच समस्या नसायची.

आणि सव्वाआठच्या बसला सर्व वयोगटातील, विद्यार्थी विद्यार्थिनी पण गर्दीचा भाग बनत. मला पार करावयच्या पन्नासेक छोट्यामोठ्या थांब्यांपैकी अर्धे थांबे तर शाळांजवळचे असायचे. एकदा का या 'लहान देह महान गोंगाट' टोळ्यांनी किलबिलाट सुरू केला, की बसमध्ये झोपणे जवळपास अशक्य होत असे.

जीवनावश्यक नोंद: सदैव इअरफोन जवळ बाळगावेत. गाणी ऐकून आपण गोंगाटाची तीव्रता कमी करू शकतो. महत्त्वाचे हे, की आवाज खूप मोठा ठेवू नये. बधिरपणा संभवतो.

तर अश्या रितीने दिवस सुरू व्हायचा. आणि रस्त्यांतील अभौमितीक 'स्पीड ब्रेकर' तथा खड्डयांच्या कृपादृष्टीने इतकी आदळापट व्हायची या नश्वर मानवी शरीराची, की अंग नंतर आंबून निघायचे.

नंतर नातलगांकडे राहण्याचे सौभाग्य मला मिळालेले. आणि हॉस्टेलची सोय तेव्हा तरी नव्हती आमच्या कॉलेजमध्ये. माझे शिक्षण अधिक सुकरपणे पूर्ण होण्यामागे त्या समस्त मंडळींचा मोलाचा वाटा आहे. तसेच, तो बसचा प्रवास मला अनेक व्यक्तींना भेटायला द्यायचा. कधी एखादे बँक कर्मचारी तर कधी एखादे शिक्षक भेटायचे. दोन तीन गडी तर आपले सहकारीच बनत.

वेळेवर पोहचण्याचीच सगळ्यांना चिंता असे. संथगतीने का होईना, आम्ही आमुच्या ठिकाणी पोहचत असू.

कदाचित जीवनाचे पण असेच असते. प्रवासात प्रत्येकाची स्वतःची ध्येये असतात. हेतू समान असणारे आपले सारथी बनतात. न् त्रासदायक अनूभवांचा तिखटपणा कमी करण्यासाठी, आपण अन्य उपाय योजतो.

सर्व गोष्टी नियोजनानुसार नाही उलगडत. अन् या जीवनप्रवासातील रस्ते, खाचखळगे आणि महत्त्वाचे थांबे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच. स्वरूपात वेगळेपणा असेलही. परंतु त्रास होत असतोच प्रत्येक व्यक्तीला.

तरीदेखील कधी धावत्या वृक्षवेलींकडे बघत, कधी मनोरंजनाच्या मदतीने नाहीतर झोपेचे सोंग घेऊन, हळूहळू आपण आपल्या उद्दिष्टाकडे मार्गक्रमण करित राहायचे असते; परिस्थिती न् घड्याळाचे काटे कसेही फिरू देत. सुदैव काय न् दुर्दैव काय... आयुष्य म्हटले की सगळे चालायचेच.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तर्कशुद्ध विचार व निर्णय - Logical Thinking | Akp51v मराठी

मराठीतून मजकूरनिर्मिती करण्याची आवश्यकता | Akp51v मराठी