मराठीतून मजकूरनिर्मिती करण्याची आवश्यकता | Akp51v मराठी

आंतरजाल (इंटरनेट) प्रचंड ज्ञानाने समृद्ध आहे. हे सारे ज्ञान कधी ध्वनीच्या रूपाने, तर कधी हलत्या चलतचित्रांतून (मोशन ग्राफिक्स) आपल्याला जाणून घेणे सहजशक्य असते.

परंतु इंटरनेटचे जन्मस्थान पश्चिमेकडील राष्ट्रांत आहे. याचा परिणाम म्हणजे सारे 'ऑनलाइन' असलेले माहितीस्रोत मुख्यतः इंग्रजीतून असल्याचे आपणांस आढळते. तरीदेखील यासाठी पाश्चात्य देशांतील युवक-युवती तसेच अन्य अबालवृद्ध इत्यादि व्यक्तींचे योगदान कारणीभूत ठरते.

Marathi content ब्लॉग इमेज article image
ब्लॉग इमेज: Create Marathi content.

इंग्रजीतून उपलब्ध असलेले वैश्विक ज्ञान जाणून घेण्यासाठी इंग्रजी शिकण्याचा प्रयास करणे, तथा त्यादृष्टीने इंग्रजी माध्यमातून पुढील पिढीस शिकवू पाहणे, यात तांत्रिकदृष्ट्या काहीच गैर किंवा अनैसर्गिक नसले; तरी काही गोष्टींचा आपण विसर पडू देता कामा नये.

इंग्रजी ही पण एक भाषा आहे, आणि जर आधीच्या पुर्वजांनी चारहून अधिक भाषा अवगत केल्या असतील, ज्यांचा आकडा कधीकधी १० च्या पण पुढे जायचा, तर मग विविध भाषा शिकणे आपलेसुद्धा नैतिक कर्तव्यच ठरते. आणि सारे तत्त्वज्ञान दोन क्षण बाजूला ठेवले, तरीदेखील आपण आपल्या मातृभाषेत मजकूर व साहित्यनिर्मिती का करू नये?

देवनागरी लिपीतूनसुद्धा ऑनलाईन संवाद तथा चॅटिंग करणे शक्य असते.

तर मग 'मला नाही जमत देवनागरी टाईपिंग' अशा कारणांमुळे जरी आपण लॅटिन लिपीतून, म्हणजेच इंग्रजी अक्षरांमधून, मराठी व हिंदी लेखन केलेच; तरी ते वाचायला कमी श्रम लागतात की अधिक?

प्रत्येक किबोर्ड, मग तो आपल्या संगणकाचा (कम्प्युटर) असू द्यात, तथा भ्रमणध्वनीचा (फोन); त्यामध्ये देवनागरी लिपीचा पर्याय असणार म्हणजे असणारच! साधी गोष्ट आहे, जर कुठल्याही उद्योगाला व ॲपला भारतात विस्तार करायचा असेल, तर देवनागरी लिपीकडे कानाडोळा केल्यास, आर्थिक वृद्धी करणे शक्य होईल का त्यांना?

अवघड असेल शिकणे; लागेल बराच वेळ.

प्रत्येक मनुष्याची आकलनशक्ती (ग्रास्पिंग पॉवर) भिन्न असते. आपल्याला एखाद्या साधनाचा उपयोग शिकायला व समजायला इतरांहून अधिक वेळ लागण्यात काहीही चुकीचे असे नाही; निदान कुठलेही तत्त्वज्ञान वा कुठलाही कायदा आपणांस सोयीस्कर गतीने ज्ञानाराधना करण्यापासून थांबवित नाही.

संथ गतीने का होईना, सातत्याने नव्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे या एकविसाव्या शतकात तग धरण्यासाठी.

पिढ्यांमधील वैचारिक व भावनिक दुराव्यांमुळे (जनरेशन गॅप) सगळेच तरूण-तरूणी आपल्याला या कार्यात उत्सुकतेने सहकार्य करतीलच, असे नाही. परंतु एका आठवड्याला एक कौशल्य शिकणे, या पद्धतीनेसुद्धा, आपण आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकताच.

त्या त्या स्थानिक तथा प्रादेशिक भाषेत मजकूर व साहित्यनिर्मिती (कन्टेंट क्रिएशन) झाल्यास, आपसूकच भाषांना अधिक मोठा प्रेक्षकवर्ग लाभेल.

आपल्याकडील अनेक जुने चित्रपट, जुनी नाटके, जुन्या मालिका यांना इंग्रजीतून उपलब्ध केल्यास, आपल्या स्थानिक जीवनशैलींविषयी परदेशी मानवांदेखील जाणून घेता येईल. दरवर्षी भारतातील विविध ठिकाणांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या आकडेवारीवरून त्यांच्या कुतूहलाची कल्पना कुणालाही सहज यावी.

प्रत्येकाने एकदम ब्लॉगलेखनाकडे वळले पाहिजे, असे कुणीच सांगत नाही आहे.

परंतु विकीपिडीया वर मराठीकरणाला हातभार लावायचा प्रयास करणे, शक्यतो देवनागरी लिपीतूनच मराठी व हिंदी यांसारख्या भाषांचा प्रयोग करणे व 'इंटरनेटवरील मराठी कन्टेंट इंग्रजीहून कमी आहे' अश्या तक्रारी करण्यात ऊर्जा वाया न घालवणता प्रत्यक्षात मराठी भाषेचा देवनागरी लिपीतून वापर करणे, इत्यादि सर्व तर प्रत्येकाच्या हातात नेहमीच होते, आहे व राहील.

Blogger:

1. हिंदी लेखावकाश

https://hindi-lekhaavkash.blogspot.com

Instagram:

2. akp51v मराठी Marathi

https://instagram.com/akp51v_m

3. akp51v हिंदी Hindi

https://instagram.com/akp51v_h

Twitter:

4. मराठी ट्विटर

https://twitter.com/Akp51vM

5. हिंदी ट्विटर

httpe://twitter.com/Akp51vH

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तर्कशुद्ध विचार व निर्णय - Logical Thinking | Akp51v मराठी

विद्यार्थ्याची आठवण, एका बसप्रवासाची | Akp51v मराठी